चालू घडामोडीटेक न्यूजतुमचा फायदालाईफस्टाईलव्हायरल

Nashik News: गणेशभक्तांसाठी बातमी; बाप्पासाठी आता डीजे वाजणार नाही, पोलिसांची मनाई; परवानगी अर्जात सतराशे साठ अटी

Ganeshotsav Laser DJ Banned: नाशिक पोलिस आयुक्तालयाने पोलिस ठाणेनिहाय गणेशोत्सव मंडळांची यादी तयार करण्यास सुरुवात केली आहे. आयुक्त संदीप कर्णिक यांनी

म. टा. प्रतिनिधी, नाशिक : अवघ्या महिनाभराने लाडक्या गणरायाचे थाटात आगमन होणार असल्याने गणेशोत्सव मंडळांसह पोलिसांनीही नियोजन सुरू केले आहे. गतवर्षी प्रखर लेझरमुळे अनेक भाविकांच्या डोळ्यांना इजा झाल्याने यंदा लेझरवर थेट फुली मारण्यात आली असून, कोणत्याही मंडळाला डीजे वाजविण्यासदेखील परवानगी मिळणार नाही. त्यामुळे यंदा लेझरसह कर्णकर्कश आवाजाचे ‘विघ्नहरण’ होणार आहे.

या नियमांचे पालन न केल्यास संबंधित मंडळांवर गुन्हे नोंदवून कायदेशीर कारवाईचा इशाराही पोलिस आयुक्तालयाने दिला आहे. नाशिक पोलिस आयुक्तालयाने पोलिस ठाणेनिहाय गणेशोत्सव मंडळांची यादी तयार करण्यास सुरुवात केली आहे. आयुक्त संदीप कर्णिक यांनी नियमांचे काटेकोर पालन करणाऱ्या मंडळांना अटी-शर्तींसह परवानगी देण्याची सूचना केली आहे. त्यानुसार विशेष शाखेमार्फतही यापूर्वी गुन्हे नोंद असलेल्या मंडळांना अगोदरच ‘वॉर्निंग’ देण्यात येणार आहे. दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीमुळे यंदा गणेशोत्सवात धिंगाणा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी बंदोबस्तासह मंडळांच्या परवानगीबाबत कठोर भूमिका घेतली आहे. यंदाही नेहमीप्रमाणे कोणत्याही मंडळाला डीजे लावण्यास परवानगी नसेल. शिवाय यंदा लेझर लाइट बसविण्यावरही पोलिस निर्बंध लागू करणार आहेत. गणेशोत्सव मोठ्या उत्साहात पण, नियमांत साजरा करण्यासाठी नियमावली करून मंडळांची बैठक घेत त्यांना सूचित करणार असल्याचे आयुक्तालयाने सांगितले.

कर्णकर्कश ‘भिंती’ रोखणार?

सन २०२३ वगळता त्यापूर्वी सलग तीन-चार वर्षे नाशिकच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजे वाजविण्यात आले नव्हते. उर्वरित साउंड सिस्टीम व ढोल पथकांसह पारंपरिक वाद्यांचा आवाजही मर्यादित होता. परंतु, सन २०२३ मध्ये पोलिसांनी कठोर भूमिका न घेतल्याने काही मंडळांनी डीजेच्या कर्णकर्कश ‘भिंती’ उभारल्या होत्या. त्यानंतर पोलिसांनी काही मंडळांवर कायदेशीर कारवाई केली. त्यामध्ये रोकडोबा, मेनरोडचे शिवसेवा, मुंबई नाक्यावरील युवक, युनायटेड फ्रेंड सर्कल, काजीपुरा चौकातील दंडे हनुमान, जेलरोडचे साईराज फाउंडेशन या मित्रमंडळांचा समावेश होता. यंदा आगामी विधानसभा निवडणुकीमुळे तरुणाईला आकर्षित करण्यासाठी मंडळे अधिक आवाज ठेवण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे यावर्षी पोलिस कठोर भूमिका ठेवत कर्णकर्कश ‘भिंती’ रोखणार का, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

डीजे-लेझरमुळे ‘विघ्न’

सलग चार वर्षांनंतर सन २०२३ मध्ये शहरातील गणेश विसर्जन मिरणुकीत डीजेसह लेझरचा वापर झाल्याने हुल्लडबाजांसह टवाळखोरांचा वावर वाढला होता. त्यामुळे गणरायाला निरोप देणाऱ्या मिरवणुकीत काहीसे ‘विघ्न’ही निर्माण झाले होते. त्यामध्ये रात्री साडेआठ वाजता भद्रकाली भाजी मार्केटजवळ धक्का लागल्याच्या कारणातून तरुणाच्या डोक्यात फायटर मारणे, उपनगर हद्दीत रात्री आठ वाजता विसर्जन मिरवणुकीत तरुणावर शस्त्राने वार, भद्रकाली हद्दीत ढोलवादकाला भोवळ येणे या स्वरूपाच्या घटना घडल्या. पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे अनुचित प्रकार घडले नव्हते. मात्र, यंदाच्या गणेशोत्सवासह विसर्जन मिरवणुकीत नियमांचे तंतोतंत पालन होण्यासाठी पोलिसांनी अधिक कठोर व्हावे लागेल, असे नाशिककरांचे मत आहे.

लेझरमुळे काय घडले?

सन २०२३ च्या गणेश विसर्जन मिरवणुकीतील प्रखर लेझरमुळे अनेक भाविकांच्या डोळ्यांना इजा झाली होती. शहरातील काही नेत्रविकारतज्ज्ञांकडे २०-२५ वयोगटातील अनेक तरुण दृष्टिदोषाची तक्रार घेऊन उपचारासाठी गेले होते. त्यांचे नेत्रपटल तपासले असता त्यावर रक्त साकळले होते. नेत्रपटलावर काहीसे भाजल्यासारख्या जखमाही होत्या. त्या रुग्णांच्या डोळ्यांना कोणताही मार लागलेला नव्हता. मिरवणुकीत डीजे आणि लेझर शोसमोर नाचल्याने त्यांच्या डोळ्यांना दुखापत झाल्याचे निदान त्यावेळी डॉक्टरांनी केले होते.

गतवर्षी गणेश विसर्जन मिरवणुकीत ध्वनिमर्यादेचे उल्लंघन केलेल्या मंडळांवर गुन्हे नोंदविले आहेत. त्यांना यंदा लेखी तंबी देण्यात येईल. इतर मंडळांनाही नियमांचे पालन करावेच लागेल. लेझर लाइट शक्यतो लावू नयेत. जे लाइट बसविण्यात येतील, त्यांचा प्रकाश मर्यादित असावा. या स्वरूपाच्या अटी-शर्तींसह परवानगी देण्यात येईल.

– किरणकुमार चव्हाण, पोलिस उपायुक्त, झोन-१

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button