Maharashtra Medical admission: होमिओपॅथीच्या प्रवेशासाठी मुदतवाढ, पर्सेंटाइल सवलतीनंतर सीईटी कक्षाचा मोठा निर्णय
Medical admission in maharashtra: नीट परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना आयुष पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी किमान ५० पर्सेंटाइल मिळविणे गरजेचे असते. आयुर्वेद, होमिओपॅथी व युनानी या अभ्यासक्रमांचे प्रवेश आयुष मंत्रालयांतर्गत येतात. राज्यभरातील या अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सीईटी सेलमार्फत राबविली जात आहे. या प्रवेशांच्या नियमित व मुक्त फेऱ्यानंतरही अनेक राज्यांमध्ये जागा रिक्त राहिल्याचे दिसून आले आहे.
रोहन टिल्लू, मुंबई : होमिओपॅथीसह युनानी आणि आयुर्वेद या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आयुष मंत्रालयाने ५० पर्सेटाइलच्या अटीत सवलत देण्याचा निर्णय घेतल्यानंतर, सीईटी कक्षाने या अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ दिली आहे. आता विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमांच्या रिक्त जागांसाठी २८ नोव्हेंबरपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत. तर तात्पुरती निवड यादी २९ नोव्हेंबरला जाहीर होईल.
आयुष मंत्रालयाने जाहीर केलेल्या होमियोपॅथी, आयुर्वेदिक आणि युनानी या शाखांच्या पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना नीट परीक्षेत किमान ५० पसेंटाइल मिळवणे आवश्यक होते. या अटीमुळे या अभ्यासक्रमांच्या अनेक जागा रिक्त राहिल्या होत्या. त्यामुळे आयुष मंत्रालयाने ५० पर्सेटाइलची अट शिथील करत ३५ पसेंटाइल ग्राह्य धरण्याचा निर्णय घेतला. आरक्षित प्रवर्गांसाठी ही मर्यादा २५ पसेंटाइलपर्यंत आणि दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ३० पर्सेटाइलपर्यंत आणण्याचा निर्णयही मंत्रालयाने घेतला. सुधारित
वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांना २८ नोव्हेंबरपर्यंत अर्जनोंदणी आणि शुल्क भरण्याची मुदत देण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांची तात्पुरती गुणवत्ता यादी आणि जागांचा तपशील २९ नोव्हेंबर रोजी जाहीर होणार आहे. ३० नोव्हेंबर ते २ डिसेंबरदरम्यान विद्यार्थ्यांना महाविद्यालयांचा पसंतीक्रम भरायचा आहे. ४ डिसेंबरला तिसऱ्या मुक्त फेरीसाठी निवड यादी जाहीर केली जाईल. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना ५ ते ९ डिसेंबर या कालावधीत महाविद्यालयात प्रत्यक्ष जाऊन प्रवेश घ्यायचा आहे. या फेरीनंतरही जागा रिक्त राहिल्यास नव्या फेरीचे नियोजन केले जाईल, असे राज्य सीईटी कक्षाने स्पष्ट केले आहे.